
Image Source:(Internet)
नागपूर : शहरात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर आणि साठवणूक करणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वर्धमाननगर परिसरातील मेसर्स हरिओम ट्रेडर्स या प्रतिष्ठानावर महापालिकेच्या नासधूस शोध पथकाने छापा टाकून ६२५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केले. या प्रकरणी संबंधित प्रतिष्ठानावर ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.
लकडगंज क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिकचा साठा केल्याची माहिती महापालिकेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे लकडगंज आणि गांधीबाग क्षेत्रातील पथकाने संयुक्तपणे वर्धमाननगर येथील ऑक्ट्रॉयमुक्त क्षेत्रातील हरिओम ट्रेडर्सची तपासणी केली.
तपासणीदरम्यान प्रतिष्ठानात प्रतिबंधित एकल वापराच्या प्लास्टिकचा मोठा साठा आढळला. त्यानंतर पथकाने संपूर्ण साठा ताब्यात घेत ६२५ किलो प्लास्टिक जप्त केले. संबंधितांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार कारवाई करण्यात आली असून, प्रथमच नियमभंग केल्याने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
नासधूस शोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पथकप्रमुख वीरसेन तांबे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर उपायुक्त राजेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला.
लकडगंज क्षेत्राचे सुशील गुप्ते आणि गांधीबाग क्षेत्राचे नथ्थू खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. प्रतिबंधित प्लास्टिकचे उत्पादन, साठवणूक किंवा वापर करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.