नागपुरातील ताजनगरात शस्त्रांचे प्रदर्शन; तलवार-चाकू घेऊन फिरणाऱ्या टोळक्याने उडवली नागरिकांची झोप

    01-Sep-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजनगर परिसरात तलवार आणि चाकू घेऊन फिरणाऱ्या ७ ते ८ तरुणांनी गोंधळ घालत नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. ३० ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी सोनू पिल्लेवार याच्यासह ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकींवरून आले, शस्त्रे दाखवत फिरले-
ताजनगरातील गल्ली क्रमांक ८ येथे ३ ते ४ दुचाकींवरून तरुणांचे टोळके दाखल झाले. त्यांच्या हातात तलवार आणि चाकू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. टोळक्याने परिसरात फिरत नागरिकांना शस्त्रे दाखवून धमकावल्याचा आरोप आहे.

तक्रारदार रकीब खान हे जेवणानंतर घराबाहेर आले असता त्यांना आरडाओरड ऐकू आली. त्यांनी रस्त्यावर जाऊन पाहिले असता काही तरुण दुचाकींवरून फिरताना दिसले. त्यापैकी तिघांनी तक्रारदाराच्या जवळ जाऊन तलवार व चाकू दाखवत धमकावल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर हे तरुण दुचाकींवरून परिसरात फिरत राहिले. हातातील शस्त्रे हवेत लहरवत त्यांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केल्याचा आरोप आहे.

जुन्या वादातून प्रकार घडल्याचा संशय-
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, राहुल कटोते आणि बिल्लू यांच्यात पूर्वी काही कारणावरून वाद झाला होता. याच वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल कटोते याचा मेहुणा सोनू पिल्लेवार आणि त्याच्या साथीदारांनी ताजनगर परिसरात हंगामा केल्याचा पोलिसांना संशय आहे.

या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह भारतीय शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. घटनेनंतर संशयित पसार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मानकापूर पोलीस ठाण्याचे हरेश कालसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.