राज्यात पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन दिवस अनुकूल वातावरण

    08-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे अनेक भागांतील पिकांना मोठा आधार मिळाला. मात्र आता पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून, पुढील दोन ते तीन दिवस काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सूनच्या सुरुवातीला जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. त्यानंतर जूनच्या अखेरीस पावसाने जोर धरला. जुलैच्या सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग आला. मात्र जुलैच्या मध्यात पुन्हा पावसाने दडी मारल्याने पिकांची चिंता वाढली होती.

२० जुलैपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने पुन्हा जोर पकडला. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतीला दिलासा मिळाला, तर अनेक धरणांच्या पाणीपातळीतही वाढ झाली. मात्र ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे.

कोकण विभागातही पावसाची तीव्रता घटली असून, आज काही भागांसाठी पिवळा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील पावसाच्या स्थितीत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस पावसासाठी वातावरण अनुकूल असले तरी त्यानंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या पावसाळ्यावर अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आधीच व्यक्त करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे.

विशेषतः मराठवाड्यातील काही भागांत अद्यापही सरासरी पावसाची तूट कायम आहे. दुसरीकडे, राज्याच्या काही भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पावसाचे वितरण कसे राहते, याकडे शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष लागले आहे.