
Image Source:(Internet)
नागपूर : महाराष्ट्र पोलीस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला असून, पोलीस महासंचालक (डीजीपी) कार्यालयाने राज्यातील १५० पोलीस निरीक्षकांच्या (पीआय) बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये नागपूर शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नवीन नेतृत्व पाहायला मिळणार आहे.
जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रितेश अहेर यांची नाशिक शहरात बदली करण्यात आली आहे. तर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळ महाजन यांची पुणे शहरात नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय विजय चव्हाण यांची नागपूर येथील डायल-112 विभागात, प्रशांत पोतदार यांची जालना, सुरेश डांबरे यांची वर्धा आणि नितीन पतंगे यांची परभणी येथे बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, नागपूर पोलीस आयुक्तालयातही नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर ग्रामीणचे प्रमोद घोंगे, अमरावती शहरचे महेंद्र आंभोरे, अमरावती ग्रामीणचे अजित राठोड तसेच नक्षलविरोधी अभियानात कार्यरत भावना धुमाळे यांची नागपूर शहर पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.
तसेच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील (एसीबी) महेश कोंडावार यांची नागपूर ग्रामीण पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यभरातील या व्यापक बदल्यांनंतर संबंधित अधिकारी लवकरच आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. या फेरबदलामुळे पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढून कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.