गणेशोत्सवासाठी एसटीची विशेष तयारी; कोकण मार्गावर ५,२२० अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन

    07-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विशेष वाहतूक आराखडा तयार केला आहे. यंदा ७ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत कोकणातील विविध मार्गांवर तब्बल ५,२२० अतिरिक्त बसफेऱ्या चालविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

एसटी मुख्यालयात झालेल्या नियोजन बैठकीत गणेशोत्सवासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातील लाखो चाकरमानी दरवर्षी गणरायाच्या उत्सवासाठी आपल्या गावी जात असल्याने त्यांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

गेल्या आषाढी एकादशी यात्रेदरम्यान एसटीने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त बससेवा उपलब्ध करून दिली होती. त्या अनुभवाच्या आधारे यंदाच्या गणेशोत्सवातही अधिक बसफेऱ्या चालवून प्रवाशांना वेळेत आणि सुरक्षित सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे.

या विशेष बससेवेचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळासह अधिकृत मोबाईल ॲप आणि राज्यातील विविध बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रांमधून करता येणार आहे. तसेच १० ऑगस्टपासून किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, पात्र महिला व ज्येष्ठ नागरिकांना लागू असलेल्या भाडे सवलतींचा लाभही मिळणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात प्रमुख बसस्थानकांवर अतिरिक्त कर्मचारी, नियंत्रण अधिकारी आणि मदत कक्ष कार्यरत राहणार आहेत. कोकणातील महत्त्वाच्या महामार्गांवर वाहनांमध्ये बिघाड झाल्यास तातडीने मदत मिळावी यासाठी दुरुस्ती पथकेही सज्ज ठेवण्यात येणार आहेत. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि वेळेवर व्हावा, यासाठी एसटी प्रशासनाने सर्व आवश्यक उपाययोजना केल्याचेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.