
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. जवळपास एक तास चाललेल्या या बैठकीत महाराष्ट्राच्या विकासासह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधानांनी भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. बैठकीत राज्यातील सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा आढावा, पावसाची परिस्थिती, तसेच जनतेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही भेट घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. तसेच, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मधील शिंदे गटाच्या खासदारांसह अलीकडे पक्षात दाखल झालेल्या सहा खासदारांना पंतप्रधानांनी चहापानासाठी निमंत्रित केल्याचा उल्लेख त्यांनी केला. ही बाब पक्षासाठी आणि सर्व खासदारांसाठी समाधानकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिंदे यांच्या मते, बैठकीदरम्यान खासदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे, केंद्र सरकारकडून मिळणारे सहकार्य आणि भविष्यातील योजनांवरही चर्चा झाली. या संवादामुळे महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांना अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.