कर्जमाफीचा पहिला टप्पा पूर्ण; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5,029 कोटी जमा

    07-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील निधी पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यांमध्ये जमा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे 6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये एकूण 5,029 कोटी रुपयांचे थेट हस्तांतरण केले.

आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली असून, त्यामुळे त्यांच्या कर्जाची खाती शून्य (निल) झाली आहेत. एमपीएवरील व्याज रद्द केल्यामुळे कर्जाची रक्कम कमी झाली असून, शासनाकडून भरलेल्या निधीमुळे अनेक खात्यांतील थकबाकी पूर्णपणे निकाली निघाली आहे.

यासोबतच राज्य सरकारने सर्व बँकांना कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप हंगामासाठी नवीन पीककर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी आवश्यक आर्थिक मदत वेळेत मिळणार आहे.

पहिल्या यादीतील ज्या पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही, त्यांची प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांमध्येही टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती शासनाने दिली.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केल्यानंतर पहिली लाभार्थी यादी सर्व ग्रामपंचायतींकडे पाठवण्यात आली. शेतकऱ्यांना कोणताही अर्ज भरावा लागला नाही; केवळ आधार प्रमाणीकरणाच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आज पहिल्या टप्प्यात 6.22 लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 5,029 कोटी रुपये जमा झाले असून, त्यांच्या कर्जाची खाती पूर्णपणे निकाली निघाली आहेत.

दरम्यान, बँकांकडून सुमारे 12 लाख खात्यांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याने ती खाती सुधारण्यासाठी परत पाठवण्यात आली आहेत. बँकांकडून आवश्यक दुरुस्ती झाल्यानंतर या खात्यांमध्येही कर्जमाफीची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.