
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिम्बायोसिस कॉलेजच्या मागील जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. मृतदेहाजवळील परिस्थिती पाहता, अज्ञात आरोपींनी मोठ्या दगडाने डोक्यावर वार करून त्याची हत्या केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षांदरम्यान आहे. त्याची अद्याप ओळख पटलेली नसून, त्याने पांढऱ्या-राखाडी रंगाचा चेक्सचा फुल स्लीव्ह शर्ट परिधान केला होता. शर्टच्या कॉलरवर "SELECT" असे नाव लिहिलेले आहे. तसेच त्याने निळ्या रंगाची जीन्स घातली असून तिच्या मागील खिशावर "DENIM" असा इंग्रजीतील उल्लेख आहे.
घटनास्थळावरील पुरावे आणि परिस्थितीच्या आधारे डोक्यावर जड दगडाने वार करून हा खून करण्यात आल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. मात्र, हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, बेपत्ता व्यक्तींची माहिती तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी सांगितले की, मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. संबंधित तरुणाबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तातडीने वाठोडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.