मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' बोगद्यात अपघात; फॉर्च्युनरची आयशरला धडक, एकाचा जागीच मृत्यू

    07-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या 'मिसिंग लिंक' बोगद्यात शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या फॉर्च्युनर कारने पुढे जाणाऱ्या आयशर मालवाहू टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारमधील तुषार भूमकर (वय 30 ते 35) यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की आयशर टेम्पो अंशतः उलटला, तर फॉर्च्युनरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. टेम्पोमध्ये भाजीपाल्याची वाहतूक सुरू होती.

अपघाताची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)चे बचाव पथक, रुग्णवाहिका आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. फॉर्च्युनरमधील चार प्रवासी आणि टेम्पोतील व्यक्तींना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये भरधाव कार टेम्पोला मागून धडक देताना स्पष्ट दिसत आहे.

अपघातामुळे 'मिसिंग लिंक' बोगद्यात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, अपघातग्रस्त वाहने हटवून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.

या घटनेनंतर 'मिसिंग लिंक' बोगद्यातील अतिवेगाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाहनचालकांनी वेगमर्यादेचे पालन करून सुरक्षित अंतर राखत वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाने केले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.