
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधून फुटून बाहेर पडलेल्या २० खासदारांच्या गटातील तीन मुस्लिम खासदारांनी भाजपप्रणीत एनडीएपासून स्पष्ट अंतर राखल्याचे समोर आले आहे. माजी क्रिकेटपटू आणि खासदार युसूफ पठाण यांच्यासह खलीलुर रहमान आणि अबू ताहेर खान यांनी एनडीएच्या बैठकीला अनुपस्थित राहत, मुस्लिमांच्या विरोधात असणाऱ्या कोणत्याही विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत एनडीएची साप्ताहिक बैठक पार पडली. केंद्रीय मंत्री आणि आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित असताना, तृणमूलमधून फुटलेल्या गटातील हे तीन खासदार बैठकीला गैरहजर राहिले. यापूर्वी २१ जुलै रोजी झालेल्या एनडीए संसदीय पक्षाच्या 'मंगल मिलन' बैठकीलाही त्यांनी उपस्थिती लावली नव्हती.
खासदार अबू ताहेर खान यांनी पत्रकारांशी बोलताना, "आम्ही एनडीएमध्ये नाही आणि भाजपमध्येही प्रवेश करणार नाही. मुस्लिम समाजाच्या विरोधात असलेल्या कोणत्याही निर्णयाला किंवा विधेयकाला आम्ही पाठिंबा देणार नाही," असे स्पष्ट केले. मात्र, मतदारसंघाच्या विकासासंदर्भातील बैठकींना उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सूत्रांच्या माहितीनुसार, या तिन्ही खासदारांचे मतदारसंघ मुस्लिमबहुल आहेत. भाजपशी वाढत्या जवळीकीबाबत मतदारांकडून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्यांनी एनडीएच्या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, तृणमूलमधून फुटलेल्या २० खासदारांच्या गटाला स्वतंत्र मान्यता देण्याचा प्रस्ताव अद्याप लोकसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार, या गटाला वैध संरक्षण मिळण्यासाठी मूळ पक्षातील किमान दोन-तृतीयांश खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. त्यामुळे या तीन खासदारांच्या भूमिकेकडे राष्ट्रीय राजकारणात विशेष लक्ष लागले आहे.