येमेनजवळ भारतीय व्यापारी जहाजावर हल्ला; जहाज बुडाले, १३ भारतीयांसह सर्व १४ खलाशी सुरक्षित

    05-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात भारतीय ध्वजावरील 'एमएसव्ही फैज नूर ओलिया' या व्यापारी जहाजावर क्षेपणास्त्राद्वारे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर जहाज समुद्रात बुडाले. मात्र, जहाजावरील १३ भारतीयांसह सर्व १४ खलाशांची यशस्वी सुटका करण्यात आली असून त्यांना येमेनमधील मोखा बंदरात सुरक्षित हलविण्यात आले आहे.

माहितीनुसार, जहाजावर झालेल्या जोरदार हल्ल्यामुळे त्याचे मोठे नुकसान झाले आणि काही वेळातच ते समुद्रात बुडाले. घटनेनंतर तातडीने बचावमोहीम राबविण्यात आली. सर्व खलाशी सुरक्षित असल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे.

या घटनेचा केंद्र सरकारने तीव्र निषेध केला आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सामाजिक माध्यमांवरून हल्ल्याचा निषेध नोंदवत खलाशी सुरक्षित असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ४ ऑगस्ट २०२६ रोजी लाल समुद्रात भारतीय व्यापारी जहाजावर झालेला हल्ला अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. रियाध येथील भारतीय दूतावास येमेनी प्रशासनाच्या संपर्कात असून खलाशांच्या सुरक्षिततेवर सातत्याने लक्ष ठेवत आहे. बचावकार्यात सहकार्य केल्याबद्दल भारताने येमेनी अधिकाऱ्यांचे आभारही मानले आहेत.

व्यापारी जहाजांवर वाढत्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करत भारताने आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरील सुरक्षित आणि अखंड व्यापार पूर्ववत करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

दरम्यान, २० जुलै रोजी हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियाविरोधात नौदल नाकेबंदीची घोषणा केली होती. लाल समुद्र, एडनचा आखात आणि अरबी समुद्राला जोडणारी बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी ही जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने या परिसरातील वाढता तणाव आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.