नागपुरात अमली पदार्थांवर पोलिसांचा घाव; १.१४५ किलो गांजासह युवक अटकेत, मुख्य सूत्रधार फरार

    05-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : नागपुरात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकून १ किलो १४५ ग्रॅम गांजासह एका युवकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत गांजा आणि मोबाईलसह ४३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या रॅकेटमधील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ४ ऑगस्टच्या रात्री महाल परिसरातील चितार ओळी येथील नागोबा गल्ली क्रमांक २ मध्ये छापा टाकला. या कारवाईत शेख जुबेर शेख आबिद (२५) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ किलो १४५ ग्रॅम गांजा आणि एक मोबाईल फोन असा एकूण ४३ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान अटक आरोपीविरुद्ध यापूर्वीही शांतिनगर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी शेख इम्तियाज शेख जब्बार हा फरार असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत सहा गुन्हे आणि खुनाच्या प्रयत्नाचा एक गंभीर गुन्हा दाखल आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार पवन गजभिये यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे उपायुक्त दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली असून, फरार आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत.