सिद्धिविनायक देणगी प्रकरणाची चौकशी वेगात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विशेष ऑडिटचे आदेश

    05-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई: मुंबईतील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहार प्रकरणात राज्य सरकारने गंभीर भूमिका घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंदिरात गेल्या पाच वर्षांत जमा झालेल्या देणग्यांचे विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट) करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष तथा आमदार सदा सरवणकर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत मंदिरातील देणगी व्यवस्थापन, आर्थिक व्यवहार आणि कथित अनियमिततेबाबत चर्चा झाली. त्यानंतर शिंदे यांनी तातडीने विशेष ऑडिट करण्याचे निर्देश दिले.

या विशेष लेखापरीक्षणात गेल्या पाच वर्षांतील रोख देणग्या, सोन्या-चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू आणि इतर अर्पणांचा सविस्तर तपास केला जाणार आहे. तसेच देणग्यांच्या नोंदी, आर्थिक व्यवहार, दागिन्यांचा साठा आणि संबंधित कागदपत्रांचीही छाननी केली जाणार आहे.

ऑडिट प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विशेष लेखापरीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, चौकशीत आर्थिक गैरव्यवहार, निधीचा अपहार, देणग्यांच्या नोंदींमध्ये तफावत किंवा अन्य कोणतीही अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

देशातील सर्वाधिक देणग्या मिळणाऱ्या मंदिरांपैकी श्री सिद्धिविनायक मंदिर एक मानले जाते. त्यामुळे मंदिरातील आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. विशेष ऑडिटच्या निर्णयामुळे या प्रकरणाच्या चौकशीला गती मिळण्याची शक्यता असून, आता या अहवालातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे भाविकांसह राज्याचे लक्ष लागले आहे.