
Image Source:(Internet)
चेन्नई : तमिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. कावेरी नदीच्या पाणीवाटपाच्या मुद्द्यावर आयोजित सभेत भाषण करत असताना अभिनेत्री त्रिशा यांच्याबाबत त्यांनी कथितरित्या सूचक आणि द्विअर्थी टिप्पणी केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सभेदरम्यान उपस्थितांमधून "त्रिशा... त्रिशा..." अशा घोषणा दिल्यानंतर उदयनिधी यांनी काही क्षण भाषण थांबवून एक टिप्पणी केली. विरोधकांनी ही टिप्पणी महिलांचा अवमान करणारी आणि अश्लील असल्याचा आरोप केला आहे. मात्र, उदयनिधी यांनी आपण कोणाचेही नाव घेतले नसून चुकीचे काहीही बोललो नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा अंतिम निर्णय न्यायालय घेईल आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यास आपण तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, तमिळनाडू भाजपने या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते नारायणन तिरुपती यांनी सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया देताना हे विधान "अत्यंत आक्षेपार्ह, अश्लील आणि महिलांचा अपमान करणारे" असल्याचे म्हटले. अशा प्रकारचे वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी आणि उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करून न्यायालयीन प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
या प्रकरणामुळे तमिळनाडूच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून, न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.