
Image Source:(Internet)
नागपूर : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देश-विदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत राखी वेळेत पोहोचावी यासाठी टपाल विभागाने विशेष तयारी केली आहे. झिरो माईल्स येथील एनएसएच (NSH) बुकिंग काउंटरवर २४ तास बुकिंग सुविधा सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी शेवटच्या क्षणाची गर्दी टाळत आगाऊ बुकिंग करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
टपाल विभागामार्फत स्पीड पोस्ट, डोमेस्टिक पार्सल, आंतरराष्ट्रीय मेल आणि आंतरराष्ट्रीय पार्सल अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राखीसह मिठाई, कपडे, भेटवस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितपणे व वेळेत पाठविण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. तसेच पोस्ट कार्यालयांमध्ये पार्सल पॅकेजिंगची सुविधाही उपलब्ध आहे.
राखीच्या वाढत्या टपालाचा विचार करून नागपूरच्या झिरो माईल्स येथील एनएसएच केंद्रात राखीसाठी स्वतंत्र बुकिंग काउंटर सुरू करण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात टपाल आणि पार्सल वाहतुकीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन विशेष नियोजन करण्यात आले आहे.
ग्राहकांनी पार्सलचे योग्य पॅकिंग करावे, पिनकोडसह संपूर्ण व अचूक पत्ता लिहावा आणि वेळेआधी टपाल बुक करावे, असे आवाहन रेल्वे मेल सर्व्हिसेस, नागपूरचे अधीक्षक गणेश बी. आंभोरे यांनी केले आहे. पात्र टपाल सेवांसाठी ऑनलाइन ट्रॅकिंगची सुविधाही उपलब्ध असून, त्याद्वारे ग्राहक आपल्या टपालाचा मागोवा घेऊ शकतात.
रक्षाबंधनानिमित्त राखी आणि शुभेच्छा वेळेत व सुरक्षितपणे आपल्या आप्तस्वकीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी टपाल विभागाच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे मेल सर्व्हिसेस, नागपूरतर्फे करण्यात आले आहे.