
Image Source:(Internet)
कोल्हापूर : शिक्षणाचा प्रसार, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनातील उल्लेखनीय योगदानासाठी ओळखले जाणारे पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे मंगळवारी कोल्हापूर येथे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली झाली. त्यांनी राज्यासह देशातील विविध भागांत शैक्षणिक संस्थांची उभारणी करून गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतला. त्यांच्या संस्थांमधून घडलेले हजारो विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
शिक्षणासोबतच आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक विकासासाठीही त्यांनी मोठे योगदान दिले. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत संधी पोहोचाव्यात, या उद्देशाने त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे उभ्या राहिलेल्या संस्था आजही ज्ञान, संशोधन आणि गुणवत्तेची परंपरा पुढे नेत आहेत.
राजकीय क्षेत्रातही त्यांचा ठसा उमटला. ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री राहिले तसेच १९५७ ते १९६२ या कालावधीत कोल्हापूरचे महापौर म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. देशाच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासातील त्यांच्या मोलाच्या योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रातील एक दूरदृष्टीचा शिल्पकार, समाजाभिमुख नेतृत्व आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.