
Image Source:(Internet)
कोलकाता : देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त करणारा दावा तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी केला आहे. एनडीएमध्ये गेलेले सहा बंडखोर खासदार आणि ५० टक्क्यांहून अधिक आमदार पुन्हा पक्षात परतण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना घोष म्हणाले की, एनडीएमध्ये गेलेले सहा खासदार आणि निम्म्याहून अधिक आमदार सध्या थेट ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात आहेत. मात्र, योग्य वेळ येईपर्यंत त्यांची नावे किंवा अचूक संख्या जाहीर करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी भाजपवर गंभीर आरोपही केले. बंडखोर लोकप्रतिनिधींना पक्षात परतण्यापासून रोखण्यासाठी पोलिस आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. दबावाचे राजकारण सुरू असल्यामुळे अनेक जण उघडपणे भूमिका घेऊ शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले.
कुणाल घोष यांनी पुढे दावा केला की, "जर पोलिसांचा दबाव केवळ २४ तासांसाठी हटवला, तर आम्ही ५६ ते ५८ आमदारांची रॅली काढून दाखवू." या वक्तव्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढल्याची चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत कुणाल घोष यांच्या दाव्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांच्या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.