
Image Source:(Internet)
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी २५ वर्षीय तुषार वैद्य याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या पतीचे सुमारे तीन वर्षांपूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते. महिलेला तीन मुली आहेत. याच परिस्थितीचा फायदा घेत आरोपी तुषार वैद्य याने महिलेशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.
लग्नाचे आश्वासन देत आरोपीने महिलेला वेगवेगळ्या तारखांना विविध ठिकाणी नेले. यावेळी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा महिलेचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने लग्न करण्यास नकार दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारानंतर महिलेने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तुषार वैद्य याच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.