
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये धावत्या स्लीपर बसमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. मैनपुरी येथून नोएडाकडे जाणाऱ्या या मुलीने मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे ग्रेटर नोएडातील परी चौक परिसरात मदतीसाठी बस थांबवली. याच वेळी चालक आणि कंडक्टरने तिला बसमध्ये प्रवेश दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
४ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या प्रकाराबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, बस काही अंतर पुढे गेल्यानंतर कंडक्टरने तिच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर चालक आणि कंडक्टरने मिळून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता तिला धमकावण्यात आल्याचेही तिने पोलिसांना सांगितले.
परी चौक ते दिल्लीदरम्यान सुमारे ४७ किलोमीटरच्या प्रवासात हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मिरी गेटजवळ रिंग रोड परिसरात आरोपींनी मुलीला बसमधून उतरवले आणि त्यानंतर ते तेथून निघून गेल्याचा आरोप आहे.
घटनेनंतर घाबरून न जाता पीडित मुलगी थेट काश्मिरी गेट पोलीस ठाण्यात पोहोचली. तिने पोलिसांकडे तक्रार नोंदवत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी तिमारपूर परिसरातून बस चालक कुलदीप आणि कंडक्टर संदीप यांना अटक केली. संबंधित बसही पोलिसांनी ताब्यात घेतली असून ती न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. घटनेशी संबंधित पुरावे आणि इतर बाबींचा तपास सुरू आहे.
निर्भया प्रकरणाची आठवण; महिला सुरक्षेवर पुन्हा प्रश्न-
दिल्लीतील या घटनेमुळे २०१२ मधील निर्भया प्रकरणाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. धावत्या बसमध्ये घडलेल्या त्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. महिला सुरक्षेसाठी कायदे आणि सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षा उपायांमध्ये अनेक बदल करण्यात आले.
मात्र, त्यानंतरही सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम असल्याचे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे. बस चालक आणि कंडक्टरची काटेकोर पार्श्वभूमी तपासणी, बसमधील सुरक्षा व्यवस्था तसेच महिला आणि अल्पवयीन प्रवाशांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.