उत्तर प्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ कामगारांचा मृत्यू, अनेक जखमी

    31-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज-कौशांबी सीमेवर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाने परिसर हादरला. मोहम्मदपूर गावातील या दुर्घटनेत ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कारखान्यात काम सुरू असताना अचानक स्फोट झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून ढिगाऱ्याखाली आणखी काही कामगार अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कौशांबी जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावात दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. हे गाव प्रयागराजच्या सीमेवर असून मनौरी हवाई दल तळापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की त्याचा आवाज सुमारे दोन किलोमीटरपर्यंत ऐकू गेला.

स्फोटानंतर कारखान्यात भीषण आग लागली आणि परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. काही काळ कारखान्यात फटाक्यांचे स्फोट सुरूच असल्याने बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. या दुर्घटनेत कारखाना पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.

स्फोटाचा फटका कारखान्याच्या आसपासच्या घरांनाही बसला. सुमारे १०० मीटरच्या परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. तीन घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे. घरांची पडझड झाल्याने त्यामध्येही काही नागरिक जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह हवाई दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली. सुमारे २०० जवानांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. ढिगारा हटवण्यासाठी दहा बुलडोझर तैनात करण्यात आले असून अडकलेल्या कामगारांचा शोध घेतला जात आहे.

स्फोट झाला त्यावेळी कारखान्यात सुमारे २० कामगार काम करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्यास मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कारखान्याचा मालक आदिल असल्याचे सांगितले जात असून दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.