घाबरू नका, पोलिसांना सहकार्य करा’; मनोज जरांगे पाटलांचे कार्यकर्त्यांना टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होण्याचे आवाहन

    31-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरू झाली असून मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मुंबईकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे. १२ तारखेपर्यंत मुंबईत पोहोचा; मात्र एकाच वेळी मोठी गर्दी न करता टप्प्याटप्प्याने आणि आपल्या सोयीने मुंबईत दाखल व्हा, अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

मुंबईत येणाऱ्या मराठा बांधवांनी मित्र, नातेवाईक किंवा परिचितांच्या घरी राहण्याची व्यवस्था करावी, असेही जरांगे यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि मुंबईकरांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

पोलिसांनी अडवले तरी घाबरू नका-

मुंबईकडे येताना पोलिसांनी विचारणा केली किंवा थांबवले, तरी घाबरून जाऊ नका. पोलिसांना सहकार्य करा आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा, असे जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना बजावले. सुरुवातीपासूनच मोठ्या संख्येने झेंडे किंवा आंदोलनाची ओळख दर्शविणारे साहित्य घेऊन मुंबईत दाखल होऊ नका, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुंबईत मराठा समाजाची मोठी संख्या असल्याने कार्यकर्त्यांच्या निवासाची व्यवस्था करणे शक्य असल्याचे जरांगे यांनी म्हटले. मात्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारशी थेट चर्चा नसल्याचा जरांगेंचा दावा-
राज्य सरकारकडून चर्चेचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी आपल्याशी अद्याप थेट संपर्क झालेला नाही, असा दावा जरांगे पाटील यांनी केला. मंत्री उदय सामंत आणि इतर नेते चर्चेसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात असले, तरी आपल्यापर्यंत कोणताही ठोस प्रस्ताव आलेला नसल्याचे त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानिक मागण्यांवर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र ‘संविधानिक मागण्या’ म्हणजे नेमके काय, याचा सरकारने स्पष्ट खुलासा करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तयारी-

गणेशोत्सवाच्या काळातच आंदोलन होणार असल्याने मुंबईकरांना होणाऱ्या संभाव्य गैरसोयीचा मुद्दाही चर्चेत आला आहे. मात्र गणेशोत्सव आणि मराठा आंदोलन या दोन्ही बाबी समाजाच्या भावनांशी जोडलेल्या असल्याचे जरांगे यांनी म्हटले.

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण तसेच पुणे, ठाणे, कल्याण आणि पनवेल परिसरातील मराठा बांधवांनी आंदोलनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. १२ तारखेच्या काही दिवस आधीपासूनच मुंबईत पोहोचून राहण्याची व्यवस्था करा आणि आंदोलनासाठी सज्ज राहा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.