‘छात्रों की गूंज’ नव्हे, ‘झूट की गूंज’; राहुल गांधींच्या दाव्यांवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

    31-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधत असून, पुण्यातील कार्यक्रमात त्यांनी महिलांची स्थिती, महिलांना करिअरच्या संधी आणि महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. याच आरोपांना फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

पुण्यात भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करताना फडणवीस यांनी राहुल गांधींच्या कार्यक्रमाला लक्ष्य केले. “राहुल गांधींचा ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम नसून ‘झूट की गूंज’ आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.

राहुल गांधी तरुणींना त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात बंड करण्याचे आवाहन करतात. भारत हा पितृसत्ताक देश असून महिलांना येथे स्थान नाही, असा संदेश दिला जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

तरुणाईला मी युवाशक्ती मानतो-
आजच्या तरुणांना अनेकजण ‘जेन झी’, ‘अल्फा जनरेशन’ किंवा ‘बीटा जनरेशन’ अशा नावांनी संबोधतात. मात्र, “मी या तरुणाईला युवाशक्ती मानतो. ही युवाशक्ती अत्यंत हुशार आहे,” असे फडणवीस म्हणाले.

राहुल गांधी यांनी कर्नाटकातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात केलेल्या दाव्यांचाही त्यांनी उल्लेख केला. राहुल गांधी यांनी मांडलेल्या ४० मुद्द्यांपैकी २९ मुद्दे एका तरुणीने तथ्य पडताळणी करून खोटे ठरवल्याचा दावा फडणवीस यांनी केला. या तरुणीने ‘झूट की गूंज’ नावाची संकेतस्थळ सुरू करून राहुल गांधींच्या दाव्यांची माहिती मांडल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रकरणानंतर कर्नाटक सरकारने संबंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल केल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.

काँग्रेसवरही साधला निशाणा-
फडणवीस यांनी यावेळी काँग्रेसच्या महिला सक्षमीकरणाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. “महिलांना संधी देण्याची वेळ आली तेव्हा काँग्रेसने प्रियंका गांधी यांना संधी का दिली नाही?” असा सवाल त्यांनी केला.

हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी काँग्रेसला एकही महिला सापडत नाही, असा आरोप करत फडणवीस यांनी काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचे म्हटले.

‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरूनही त्यांनी काँग्रेसवर टीका केली. “या देशातील मातृशक्तीचे सर्वात मोठे प्रतीक वंदे मातरम् आहे,” असे सांगत स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान देतानाही ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला, असे फडणवीस म्हणाले. सोनिया गांधी यांनी ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावर आक्षेप घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

एकूणच, राहुल गांधींच्या तरुणांशी संवाद साधणाऱ्या कार्यक्रमावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली असून, फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे आहेत.