१९ ऑगस्टला आलेल्या ई-मेलमध्ये ३१ ऑगस्टचा उल्लेख

Image Source:(Internet)
नागपूर : शहरातील १८ नामांकित शाळांना तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाल्याने नागपुरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. १९ ऑगस्ट रोजी आलेल्या या ई-मेलमध्ये ३१ ऑगस्टचा उल्लेख करण्यात आल्याने आज संबंधित शाळांमध्ये विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित १८ शाळांनी आज सुट्टी जाहीर केली आहे. धमकीचे ई-मेल मिळाल्यानंतर पोलिसांनी शाळांच्या परिसराची आणि आजूबाजूच्या भागाची सखोल तपासणी केली. या तपासणीत अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक पदार्थ आढळला नसल्याची माहिती आहे.
प्राथमिक तपासात हे धमकीचे ई-मेल बांगलादेश आणि फ्रान्समधून पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ई-मेलचा नेमका स्रोत, त्यामागील व्यक्ती आणि धमकी देण्यामागचा उद्देश शोधण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू आहे.
दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित शाळांच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून गस्तही वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
या प्रकारामुळे पालकांमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी शाळांमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक सापडलेले नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पोलिस व प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.