
Image Source:(Internet)
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या साखर आणि गुळाच्या किमती आता कमी होऊ लागल्या आहेत. घाऊक बाजारात अवघ्या आठवडाभरात साखरेच्या दरात किलोमागे सुमारे १५ रुपयांची, तर गुळाच्या दरात ७ ते ८ रुपयांची घसरण झाली आहे.
गेल्या जूनपासून साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत होती. श्रावणातील सण आणि विविध कार्यक्रमांमुळे मागणी वाढल्याने बाजारावर त्याचा परिणाम झाला होता. घरगुती वापराबरोबरच मिठाई, खाद्यपदार्थ आणि इतर उद्योगांकडूनही साखरेची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू होती. त्यात मागील हंगामातील कमी उत्पादन आणि पावसाला झालेला उशीर यामुळे साखरेच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आणि दर चढले.
साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम गुळाच्या बाजारावरही झाला होता. मात्र, बाजारातील उपलब्धता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने साखर आयातीला परवानगी दिल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. सुरुवातीला साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्यापासून साखर तयार होण्यासाठी वेळ लागणार असल्याने तयार साखर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुणे मार्केट यार्डात सध्या दररोज सुमारे १०० ते १५० टन साखरेची आवक होत आहे. गुळाचीही ७० ते ८० टनांपर्यंत रोज आवक होत आहे. त्यामुळे बाजारात साखरेचा पुरवठा वाढला असून त्याचा परिणाम किमतीवर दिसून येत आहे.
आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी असे महत्त्वाचे सण असल्याने साखर आणि गुळाच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या बाजारात पुरेसा साठा उपलब्ध असल्याने लगेचच मोठी दरवाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून कमी व्यक्त केली जात आहे.
साखरेचे व्यापारी मुकेश गोयल यांच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारच्या आयातीच्या निर्णयामुळे बाजारात साखरेचा पुरवठा वाढला आणि दर कमी झाले. दर वाढत असताना ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात साखर खरेदी केल्याने सध्या बाजारात पुरेसा साठा आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, रक्षाबंधनाच्या काळातील खरेदी संपल्याने गुळाची मागणीही काही प्रमाणात घटली आहे. परिणामी गुळाच्या दरात ७ ते ८ रुपयांची घसरण झाली. आगामी सणांमध्ये मागणी वाढण्याची शक्यता असली तरी साखरेचे दर स्थिर राहिल्यास गुळाच्या किमतीतही मोठी वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.