विकसित भारत घडवायचा असेल तर...; तुकाराम मुंढेंचा विद्यार्थ्यांना संदेश

    03-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र आणि महासत्ता बनविण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती पुरेशी ठरणार नाही, तर समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक आणि चिकित्सक विचारांची जपणूक होणे तितकेच आवश्यक आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

स्मृतीशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्टतर्फे वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित शिष्यवृत्ती वितरण आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले.

मुंढे म्हणाले, समाजातील प्रत्येक लोकप्रिय मत किंवा बहुसंख्यांचा निर्णय योग्य असेलच असे नाही. समाजहित आणि नैतिक मूल्यांना धक्का पोहोचवणाऱ्या प्रवृत्तींना विरोध करण्याचे धैर्य प्रत्येकाने ठेवले पाहिजे. विशेषतः झुंडशाहीच्या वाढत्या मानसिकतेविरोधात तरुणांनी विवेकाची भूमिका स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावावर बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या विचारांच्या पातळीवर संघर्ष सुरू आहे. खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर वेगाने पसरत असल्याने कोणतीही पोस्ट, व्हिडिओ किंवा संदेश सत्य मानण्यापूर्वी त्याची पडताळणी करणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पदवीपेक्षा कौशल्य अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सतत नवे शिकण्याची तयारी, कौशल्यविकास आणि बदल स्वीकारण्याची वृत्ती यामुळेच यशस्वी करिअर घडू शकते, असे ते म्हणाले.

समाजमाध्यमांवरील अल्गोरिदममुळे माणूस एकाच प्रकारच्या विचारांमध्ये अडकत चालल्याची खंत व्यक्त करत त्यांनी वेगवेगळ्या मतांचा आदर आणि चिकित्सक विचार करण्याची सवय विकसित करण्याचे आवाहन केले. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी बौद्धिकदृष्ट्या सक्षम आणि जबाबदार नागरिक घडणे हीच खरी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.