
Image Source:(Internet)
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांसाठी सेवा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) यंदा विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. आषाढी वारीच्या कालावधीत एसटी महामंडळाला तब्बल ४१.१८ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
यंदाच्या वारीत एसटीच्या उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी महामंडळाच्या महसुलात सुमारे ५.३० कोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. वारीदरम्यान राज्यभरातून भाविकांच्या सोयीसाठी विशेष नियोजन करत एसटीने सुमारे ५,५०० विशेष बसगाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या.
या विशेष बससेवेचा लाभ तब्बल ९ लाख २४ हजार ७३८ वारकऱ्यांनी घेतला. भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेत पंढरपूरपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या यशाचे श्रेय एसटी चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांना दिले. ते म्हणाले की, विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या प्रवासाची जबाबदारी पार पाडणे ही एसटीसाठी अभिमानाची बाब आहे.
“वारकऱ्यांना सुरक्षितपणे पंढरपूरला पोहोचवणे आणि दर्शनानंतर त्यांना सुखरूप घरी परत आणणे ही केवळ वाहतूक सेवा नसून भक्तीच्या या सोहळ्यातील एक सेवा आहे,” असे सरनाईक यांनी सांगितले.
यंदाच्या आषाढी वारीत एसटी महामंडळाच्या नियोजनाचे आणि सेवाभावाचे कौतुक होत असून, ‘लालपरी’ने पुन्हा एकदा वारकऱ्यांच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.