
Image Source:(Internet)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्या चित्रपटामुळे नव्हे, तर तुरुंगात घालवलेल्या दिवसांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील 'द अलायन्स' या रिअॅलिटी शोमध्ये उपस्थित राहिलेल्या सलमानने तुरुंगातील अनुभव सांगताना तेथील परिस्थितीचे वर्णन केले.
आपला भाऊ आणि अभिनेता सोहेल खान याला पाठिंबा देण्यासाठी सलमान खान या शोमध्ये सहभागी झाला होता. स्पर्धकांशी संवाद साधताना त्याने आपल्या तुरुंगवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
सलमान खान म्हणाला, "मी अनेक वर्षांपूर्वी तुरुंगात होतो, तेव्हा एका छोट्याशा बॅरेकमध्ये ५० ते ७० कैदी राहत होते. संपूर्ण बॅरेकमध्ये फक्त एकच भारतीय पद्धतीचे शौचालय होते. तेथील स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत वाईट होती. अनेकदा पाल दिसायच्या आणि शौचालयाची अवस्था देखील अत्यंत खराब होती."
सलमान खानला १९९८ मधील काळवीट आणि चिंकारा शिकार प्रकरणात चार वेळा अटक झाली होती. विविध टप्प्यांमध्ये त्याने एकूण सुमारे १८ दिवसांचा तुरुंगवास भोगला आहे. यापूर्वी २००८ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीतही त्याने तुरुंगातील अनुभव सांगताना, "जेव्हा तुम्हाला माहीत असते की तुम्ही चुकीचे काही केलेले नाही, तेव्हा तुम्ही धैर्याने तुरुंगात जाता. मात्र, मला सर्वाधिक चिंता तिथल्या बाथरूमची होती," असे म्हटले होते.
दरम्यान, 'द अलायन्स' या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन अभिनेता कुणाल खेमू करत आहे. या शोमध्ये चित्रपट, दूरदर्शन, डिजिटल माध्यम आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले असून, त्यांना विविध शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. शोदरम्यान सलमान खानने केलेल्या या खुलाशामुळे त्याच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.