महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरण : बृजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

    03-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली: महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता केली.

निकालापूर्वी बृजभूषण शरण सिंह न्यायालयात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी, "न्यायालय जो निर्णय देईल, तो मला मान्य असेल. माझ्या हातात काहीही नाही," अशी प्रतिक्रिया दिली होती.

न्यायालयाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त करत म्हटले, "ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाले, त्याच दिवशी मी सांगितले होते की, आरोप सिद्ध झाले तर मी स्वतःला कठोर शिक्षा स्वीकारण्यास तयार आहे. आज न्यायालयाने माझी सन्मानाने निर्दोष मुक्तता केली आहे. मी जे म्हणालो होतो ते खरे ठरले. हा माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि समर्थकांसाठी आनंदाचा क्षण आहे."

बृजभूषण शरण सिंह हे उत्तर प्रदेशातील प्रभावी राजकारणी असून ते सहा वेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केल्यानंतर हे प्रकरण देशभर चर्चेचा विषय बनले होते. अनेक नामांकित कुस्तीपटूंनी आंदोलन करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली होती.

राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाच्या या निर्णयामुळे या प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले असून, निकालानंतर राजकीय तसेच क्रीडा क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.