
Image Source:(Internet)
नागपूर; ई-२० पेट्रोलच्या सक्तीच्या वापराविरोधात नागपुरात युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. केंद्र सरकारच्या इंधन धोरणाचा निषेध करत आंदोलकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखले आणि अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
आंदोलकांनी ई-२० पेट्रोलमुळे वाहनधारकांच्या अडचणी वाढत असल्याचा आरोप केला. वाहनांचे मायलेज कमी होणे, जुन्या वाहनांच्या इंजिनवर परिणाम होणे यासारख्या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार इथेनॉलमुक्त पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
युवक काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केले की, ई-२० पेट्रोलची सक्ती न करता ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. वाहनधारकांच्या समस्या सरकारने गांभीर्याने घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, केंद्र सरकारने ई-२० इंधन मिश्रणाचे समर्थन करताना हे धोरण देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. इथेनॉल वापरामुळे कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होते तसेच पर्यावरणीय फायदे मिळतात, असा सरकारचा दावा आहे.
ई-२० पेट्रोलच्या मुद्द्यावरून नागपुरात राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस आणि केंद्र सरकार यांच्यातील आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.