
Image Source:(Internet)
नागपूर : ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसने विदर्भातून 'मंडल यात्रा'ची सुरुवात केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जनमत तयार केले जाणार असून, ओबीसींच्या विविध प्रश्नांवर सरकारला उत्तरदायी धरण्याचा निर्धार काँग्रेसने व्यक्त केला आहे. नागपूर येथे पत्रकार परिषदेत काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली.
यावेळी वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजासाठी जातनिहाय जनगणना, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, 'महाज्योती'साठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी, तसेच ओबीसी प्रवर्गातील रिक्त पदांचा बॅकलॉग भरून काढण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली. सरकारने सातत्याने ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा उभारण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले.
समृद्धी महामार्गाच्या कामांवर भाष्य करताना त्यांनी कंत्राटी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मोठ्या कंत्राटदारांना लाभ मिळावा यासाठीच निर्णय घेतले जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या जमिनींच्या संपादनातही अन्याय होत असल्याचा दावा त्यांनी केला. कमी मोबदल्यात जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून दबाव टाकला जात असल्याचेही ते म्हणाले.
राजकीय घडामोडींवर बोलताना वडेट्टीवार यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबतही मोठे विधान केले. पक्षात योग्य सन्मान मिळत नसल्याची भावना त्यांना असेल, तर त्यांनी स्वतंत्र भूमिका घ्यावी, असे सांगत त्यांनी भाजप सोडल्यास काँग्रेसकडून त्यांचे स्वागत केले जाईल, असे स्पष्ट केले.
महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. महिला खेळाडूंनी गंभीर आरोप केले असतानाही सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, अशी टीका त्यांनी केली. आंदोलन करणाऱ्या तरुणांना देशद्रोही म्हणणाऱ्यांवरही त्यांनी पलटवार करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निधीबाबत प्रश्न उपस्थित केले.
याशिवाय महाराष्ट्रातून पंतप्रधानपदासाठी नेतृत्व पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी केंद्रातील नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका केली. मुंबईतील एसआरए प्रकल्प, नाशिक कुंभमेळ्याच्या कामांतील कथित गैरव्यवहार आणि कंत्राटी प्रक्रियेवरही त्यांनी सरकारला लक्ष्य केले.
'मंडल यात्रा'च्या माध्यमातून ओबीसींचे प्रश्न, रोजगार, निधी, आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असून, या यात्रेमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.