
Image Source:(Internet)
इस्लामाबाद : जगप्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांच्या निधनाची अधिकृत पुष्टी झाली असून, पाकिस्तानमधील कराकोरम पर्वतरांगेतील ब्रॉड पीकवर झालेल्या भीषण हिमस्खलनात त्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेपूर्वी बेस कॅम्पवरून टिपलेला त्यांचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 जुलै 2026 रोजी ब्रॉड पीक (उंची सुमारे 8,047 मीटर) सर करण्यासाठी निर्मल पुर्जा आणि त्यांची टीम चढाई करत होती. त्याचवेळी कॅम्प-2 आणि कॅम्प-3 दरम्यान सुमारे 6,500 ते 7,000 मीटर उंचीवर अचानक मोठे हिमस्खलन झाले. या दुर्घटनेत अनेक गिर्यारोहक बर्फाखाली दबले.
पाकिस्तानमधील 'कराकोरम व्हिजन' या टूर ऑपरेटरने दुर्घटनेपूर्वीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या छायाचित्रात निर्मल पुर्जा आणि इतर आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक शिखराच्या दिशेने जाताना दिसत आहेत. काही क्षणांतच पर्वतावरून प्रचंड बर्फाचा थर कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. व्हायरल व्हिडिओमध्ये एका महिलेचा घाबरलेला आवाजही ऐकू येतो.
हिमस्खलनानंतर पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तान भागात तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली. मात्र, प्रतिकूल हवामान, मोठी उंची आणि दुर्गम परिसरामुळे हेलिकॉप्टर तसेच बचाव पथकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली.
आतापर्यंत चार मृतदेह सापडले असून, त्यापैकी अमेरिकेच्या मॅलरी गीस, ओमानच्या नधीरा अहमद अब्दुल्ला अल हार्थी आणि नेपाळचे पुर बहादूर गुरूंग यांची ओळख पटली आहे. निर्मल पुर्जा यांच्या कंपनी Elite Exped नेही त्यांच्या निधनाची अधिकृत पुष्टी केली आहे. उर्वरित सदस्यांचा शोध अद्याप सुरू आहे.
43 वर्षीय निर्मल पुर्जा हे नेपाळमध्ये जन्मलेले ब्रिटिश नागरिक होते. त्यांनी ब्रिटिश सैन्यात गोरखा म्हणून सेवा बजावली होती आणि स्पेशल बोट सर्व्हिसचाही भाग होते. 2019 मध्ये त्यांनी जगातील 8,000 मीटरपेक्षा उंच असलेली सर्व 14 शिखरे अवघ्या सहा महिन्यांपेक्षा थोड्या अधिक कालावधीत सर करून जागतिक विक्रम केला होता. त्यांच्या धाडसी मोहिमांमुळे ते जगभरातील गिर्यारोहकांसाठी प्रेरणास्थान बनले होते.
या मोहिमेपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर, "ब्रॉड पीक... मला फक्त सुरक्षित जाऊन परत यायचे आहे. कोणत्याही पर्वताला मी कधीच कमी लेखत नाही," असा संदेश शेअर केला होता. हा संदेश आता त्यांच्या अखेरच्या शब्दांपैकी एक मानला जात आहे.
निर्मल पुर्जा यांच्या निधनामुळे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण विश्वात शोककळा पसरली आहे. नेपाळच्या पंतप्रधानांसह जगभरातील अनेक नेते, गिर्यारोहक आणि चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनामुळे गिर्यारोहणातील जोखीम पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, सुरक्षा, हवामानाचा अचूक अंदाज आणि योग्य नियोजनाचे महत्त्व अधिक ठळकपणे समोर आले आहे.