
Image Source:(Internet)
खांडवा : रेल्वेच्या प्रवासादरम्यान पेन्ट्री कारमधून घेतलेले जेवण काही विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या १५ ते २० विद्यार्थ्यांना अचानक उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने ट्रेन खांडवा स्थानकावर थांबवून तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.
ही घटना शुक्रवारी रात्री घडली. हजरत निजामुद्दीनहून केरळमधील एर्नाकुलमकडे जाणाऱ्या मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसमध्ये मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी प्रवास करत होते. प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी पेन्ट्री कारमधील जेवण घेतले. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले.
अचानक वाढला विद्यार्थ्यांचा त्रास-
काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांना उलट्या, पोटदुखी आणि मळमळ होऊ लागली. एकाच वेळी अनेक विद्यार्थी आजारी पडल्याने ट्रेनमध्ये चिंता निर्माण झाली. घटनेची माहिती रेल्वे प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ट्रेन खांडवा रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. यावेळी पोलीस, आरोग्य विभाग आणि प्रशासनाचे अधिकारी स्थानकावर पोहोचले. विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यात आली.
स्टेशनवरच डॉक्टरांकडून तपासणी-
विद्यार्थ्यांना थेट रुग्णालयात हलवण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, स्थानकावर उपस्थित डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून त्यांच्यावर उपचार सुरू केले. रेल्वेच्या वैद्यकीय पथकानेही विद्यार्थ्यांची तपासणी केली.
प्राथमिक उपचारानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारू लागल्याने त्यांना पुन्हा ट्रेनमध्येच ठेवण्यात आले. रेल्वेचे डॉक्टर आणि कर्मचारी विद्यार्थ्यांसोबत पुढील प्रवासासाठी रवाना झाले.
अन्नातून विषबाधेचा संशय-
पेन्ट्री कारमधील जेवण घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, विद्यार्थ्यांना नेमका त्रास कशामुळे झाला, हे तपास आणि वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे स्थानकावर काही काळ मोठी धावपळ पाहायला मिळाली. सुदैवाने प्राथमिक उपचारानंतर विद्यार्थ्यांची प्रकृती नियंत्रणात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस मुंबई आणि कोकण मार्गे केरळकडे धावते. त्यामुळे रेल्वेच्या खानपान सेवेच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.