
Image Source:(Internet)
मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पक्षाने नव्या १० प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह विविध नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर पक्षाची भूमिका माध्यमांसमोर मांडण्याची जबाबदारी या प्रवक्त्यांवर असणार आहे.
कोअर कमिटीच्या बैठकीनंतर निर्णय-
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
बैठकीला जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी खासदार फौजियाताई खान, राजेंद्र शिंगणे आणि माजी आमदार ॲड. अशोकबापू पवार यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर पक्षाकडून नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली.
कोणाला मिळाली संधी?
पक्षाने जाहीर केलेल्या १० प्रवक्त्यांच्या यादीत पुढील नेत्यांचा समावेश आहे :
जितेंद्र आव्हाड
क्लाईड क्रास्टो
भीमराव हत्तीअंबीरे
अनिश गवांदे
ॲड. फैजल मिर्झा
महेबूब इब्राहीम शेख
प्रवीण कुंटे पाटील
प्रशांत सोनबा वीरकर
ॲड. हेमाताई पिंपळे
डॉ. चंद्रकांत बारेला
या सर्वांवर पक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यापूर्वी प्रवक्त्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या रद्द-
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यापूर्वी केलेल्या प्रवक्त्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ४ ऑगस्ट २०२६ पासून या नियुक्त्या पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या स्वाक्षरीच्या पत्राद्वारे हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्या काळात माजी आमदार विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडणार असल्याचे पक्षाने सांगितले होते.
आता कोअर कमिटीच्या बैठकीनंतर नव्या १० प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आल्याने पक्षाची माध्यमांमधील भूमिका मांडण्यासाठी नव्या टीमची रचना झाली आहे. आगामी काळातील राजकीय घडामोडी आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या प्रवक्त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.