रशियाचा युक्रेनवर भीषण ड्रोन हल्ला; ३७ जणांचा मृत्यू, ४२ जखमी

    29-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

कीव : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला असून संघर्ष अद्यापही सुरूच आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनच्या कीव प्रांतातील बुचा जिल्ह्यातील मायला गावातील एका गोदामावर ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात किमान ३७ जणांचा मृत्यू, तर ४२ जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

कीव प्रांताचे गव्हर्नर तिमुर तकाचेंको यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मृतांमध्ये दिमित्रिव्हस्काचे महापौर तारास डिडिच यांचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मायला येथील गोदामात दारुगोळा आणि स्फोटक सामग्री ठेवण्यात आली होती. ड्रोन हल्ल्यानंतर गोदामात मोठे स्फोट झाले आणि भीषण आग लागली. आगीचा परिणाम आसपासच्या परिसरावरही झाला.

५० निवासी इमारतींचे नुकसान
या हल्ल्यात परिसरातील किमान ५० निवासी इमारतींचे नुकसान झाले आहे. आग काही घरांसह एका उपाहारगृहापर्यंत पोहोचली. हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला असून बचाव पथके घटनास्थळी मदतकार्य करत आहेत.

दरम्यान, गोदामात स्फोटक सामग्री साठवण्यास आवश्यक परवानगी होती का, संबंधित कंपनीकडे आवश्यक परवाने आणि मंजुरी होती का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात निष्काळजीपणाच्या अनुषंगाने फौजदारी चौकशी केली जात आहे.

निवासी भागाजवळ दारुगोळा साठवण्यावर झेलेन्स्कींचा सवाल-
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनीही मायला गावातील गोदामावर हल्ला झाल्याची पुष्टी केली. निवासी भागाजवळ दारुगोळा साठवण्यास स्पष्ट मनाई असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेप्रकरणी फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हल्ल्यानंतर परिसरातून ३८० हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या भीषण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून युक्रेनच्या प्रशासनाने बचाव आणि मदतकार्याला वेग दिला आहे.