
Image Source:(Internet)
नागपूर : राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच काँग्रेसचे गटनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. मराठा समाजातील नेत्यांकडून ओबीसी प्रमाणपत्र घेतले जात असल्याच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा केला. या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
वडेट्टीवार यांच्या दाव्यावर आक्षेप घेत आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावा द्या किंवा सुप्रिया सुळे यांची माफी मागा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून देण्यात आले. त्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला आता राजकीय वादाची नवी किनार मिळाली आहे.
नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार?
ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर भूमिका मांडताना विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील मोठ्या संख्येने मराठा समाजातील लोकांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा केला. याचवेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख केला.
“सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र त्यांनी केव्हा घेतले, याची मला माहिती नाही; मात्र प्रमाणपत्र असल्याचे मला माहीत आहे,” असा दावा वडेट्टीवार यांनी केला.
ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणात वाढ होत नसताना त्यात घुसखोरी वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा परिस्थितीत ओबीसी समाजाच्या आरक्षणावर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादीकडून पुराव्याचे आव्हान-
वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे नेते चरण वाघमारे यांनी तीव्र आक्षेप घेतला. पक्षाची भूमिका जाती किंवा धर्माच्या आधारावर राजकारण करण्याची नसल्याचे सांगत त्यांनी वडेट्टीवारांना आपला दावा सिद्ध करण्याचे आव्हान दिले.वडेट्टीवारांनी आरोपाचा पुरावा द्यावा किंवा सुप्रिया सुळे यांची माफी मागावी,” अशी मागणी वाघमारे यांनी केली.या प्रकरणामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय संबंधांवरही चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये योग्य समन्वय नसल्याने अशा प्रकारचे वाद निर्माण होत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केल्याचेही समोर आले आहे.
वाद वाढल्यानंतर वडेट्टीवारांची दिलगिरी-
दरम्यान, आपल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापल्याचे लक्षात आल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिले. ओबीसी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर बोलताना अनवधानाने सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख झाला, असे त्यांनी स्पष्ट केले.सुप्रिया सुळे यांच्यावर कोणताही वैयक्तिक आरोप करण्याचा आपला हेतू नव्हता, असे सांगत त्यांनी नावाचा उल्लेख झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, दिलगिरी व्यक्त करतानाही वडेट्टीवार यांनी ओबीसी प्रमाणपत्राच्या व्यापक मुद्द्यावरची आपली भूमिका कायम ठेवली. ओबीसी प्रमाणपत्राचा वापर करून आरक्षणाचे लाभ घेणे आणि त्याच वेळी ओबीसी समाजाच्या हक्कांवर परिणाम करणाऱ्या धोरणांना पाठिंबा देणे योग्य नसल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
दरम्यान, वडेट्टीवारांच्या या वक्तव्यामुळे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नासोबतच महाविकास आघाडीतील राजकीय समन्वयाचा मुद्दाही चर्चेत आला आहे.