नागपुरात कुख्यात गुन्हेगार तीन देशी कट्टे, दोन जिवंत काडतुसांसह जेरबंद

    29-Aug-2026
Total Views |
गुन्हे शाखा युनिट-५ची मेकोसाबाग परिसरात धडक कारवाई; १.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Image Source:(Internet)

नागपूर : अवैध शस्त्रांविरोधात नागपूर गुन्हे शाखेने सुरू केलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. गुन्हे शाखा युनिट-५च्या पथकाने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेकोसाबाग परिसरात कारवाई करत कुख्यात आरोपी आकाश राजन थापा याला तीन देशी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसांसह अटक केली. त्याच्याकडून दोन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले असून, एकूण १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

पोलिसांना मेकोसाबाग येथील लेंडी मैदानात मातृछाया वाचनालयाजवळ एक संशयित व्यक्ती फिरत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरात सापळा रचला. संशयित आकाश थापा याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची झडती घेण्यात आली. यावेळी दोन मॅगझिन लावलेले देशी कट्टे, आणखी एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांच्या हाती लागली.

प्राथमिक चौकशीत आकाश थापाने ही शस्त्रे योगेश सिरिया आणि अभय यांच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील खंडवा येथील कथित शस्त्रपुरवठादार आकाश भाई याच्याकडून मिळवल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला मध्य प्रदेशातील शस्त्रपुरवठ्याचे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे.

या शस्त्रांचा वापर कुख्यात गुन्हेगाराच्या साथीदारांना धमकावण्यासाठी केला जाणार होता, असा पोलिसांना संशय आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून कुख्यात आरोपी विशाल मेश्राम याची सुटका होत असताना त्याच्या साथीदारांना धमकावण्याच्या उद्देशाने ही शस्त्रे आणण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी आकाश राजन थापा याच्यासह योगेश सिरिया, अभय आणि खंडवा येथील कथित शस्त्रपुरवठादार आकाश भाई यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघे आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत.

जरीपटका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्यातील संबंधित कलमांसह महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शस्त्रांचा नेमका स्रोत, त्यांची खरेदी-विक्री आणि या प्रकरणामागील गुन्हेगारी जाळ्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.