लाडक्या बहिणींना मोठा धक्का; ९२ लाखांहून अधिक लाभार्थी नोंदी कमी!

    29-Aug-2026
Total Views |
जुलैचा हप्ता १ कोटी ४१ लाख महिलांच्या खात्यात

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाभार्थी संख्येत मोठी घट झाली आहे. सुरुवातीला सुमारे २ कोटी ४८ लाख असलेली लाभार्थी संख्या आता सुमारे १ कोटी ६५ ते १ कोटी ७० लाखांपर्यंत आली आहे. त्यामुळे तब्बल ९२ लाखांहून अधिक नोंदी यादीतून कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

लाभार्थींच्या छानणीदरम्यान ई-केवायसी न करणे, उत्पन्नाची निर्धारित मर्यादा ओलांडणे, आयकर भरणे, सरकारी नोकरीत असणे, चारचाकी वाहनासंबंधीचे निकष तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणे अशा विविध बाबी तपासण्यात आल्या. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, ई-केवायसी पूर्ण न केलेल्या महिलांची संख्या लाभार्थी कपातीमागील प्रमुख कारणांपैकी एक आहे.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात. मात्र, जुलै महिन्याच्या हप्त्यापासून काही महिलांना वंचित राहावे लागले आहे. वयोमर्यादा आणि इतर पात्रता निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांचा लाभ थांबविण्यात येत आहे.

दरम्यान, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर २५ ऑगस्टपासून जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले. गुरुवारी संध्याकाळपर्यंत १ कोटी ४१ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर तब्बल २,०९५ कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती आहे.

सरकारकडून केवळ पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी लाभार्थी यादीची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे लाभार्थींनी आपले ई-केवायसी पूर्ण आहे की नाही आणि आपले नाव पात्र लाभार्थी यादीत कायम आहे की नाही, हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, चुकीने लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेल्या महिलांच्या तक्रारींचीही तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अपात्र ठरलेल्या महिलांना दिलासा मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.