नागपुरात पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाला सलाम; पोलीस आयुक्तांकडून गौरव

    29-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : गुन्ह्यांचा प्रभावी तपास करून आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यासोबतच न्यायालयीन कामकाजात सक्षम बाजू मांडणाऱ्या नागपूर शहर पोलिसांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पोलीस भवन येथे झालेल्या कार्यक्रमात संबंधितांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या कामाची दखल घेण्यात आली.

पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रांच्या आधारे हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींविरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. तपासादरम्यान आरोपींवर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली. या प्रकरणातील उल्लेखनीय तपासासाठी पोलीस निरीक्षक अनिरुद्ध पुरी, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक रणजीत माजगावकर, पोलीस हवालदार अंकुश राठोड आणि पोलीस अंमलदार आशीष बावणकर यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

एमआयडीसी पोलीस ठाण्यातील एका प्रकरणात प्रभावी न्यायालयीन पाठपुराव्यामुळे आरोपी दोषी ठरले. न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या कामगिरीबद्दल पोलीस हवालदार नितीन शिरसाठ आणि गुरुदास ताडपल्लीवार यांचा सन्मान करण्यात आला.

कोतवाली पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संतोष बोयने तसेच न्यायालयीन पाठपुरावा अधिकारी फौजदार प्रमोद यावले आणि गणेश डफ यांच्या कामगिरीचेही पोलीस आयुक्तांनी कौतुक केले.

गुन्ह्यांच्या तपासात अचूकता आणि न्यायालयीन प्रक्रियेत प्रभावी पाठपुरावा केल्यास दोषींना शिक्षा मिळवून देणे शक्य होते. त्यामुळे पोलिसांनी यापुढेही अशाच पद्धतीने उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले.



या मदतीमुळे नेपाळमध्ये अडकलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचा महाराष्ट्राकडे परतीचा प्रवास आता सुरू झाला आहे.