
Image Source:(Internet)
मुंबई : ‘आवारापन 2’च्या यशाचा आनंद घेत असलेल्या अभिनेता इम्रान हाश्मीच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. त्याची H1N1 चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे.
शूटिंगच्या निमित्ताने इम्रान नुकताच रांचीला गेला होता. तेथून परतल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. काही दिवस अस्वस्थ वाटल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याने वैद्यकीय चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.
डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला-
स्वाइन फ्लूची लागण झाल्यानंतर डॉक्टरांनी इम्रानला पुरेशी विश्रांती घेण्याचा आणि आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या अभिनेता विश्रांती घेत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत इम्रानकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
बंगळुरूतील कार्यक्रम पुढे ढकलला-
इम्रान शनिवारी बंगळुरूमधील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
चाहत्यांची निराशा होऊ नये यासाठी इम्रानने सोशल मीडियावर पोस्ट करत माफी मागितली. तब्येत सुधारल्यानंतर लवकरच चाहत्यांना भेटणार असल्याचे त्याने सांगितले.
‘आवारापन 2’ची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी-
दरम्यान, इम्रान हाश्मीचा ‘आवारापन 2’ हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित झाला. 2007 मध्ये आलेल्या ‘आवारापन’चा हा सिक्वेल असून चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटात इम्रान पुन्हा शिवम पंडितच्या भूमिकेत दिसत आहे. दिशा पाटनीसह सुविंदर विक्की, विजयंत कोहली आणि पूरन गब्बी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. नितीन कक्कड यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
‘बॉलिवूड हंगामा’च्या माहितीनुसार, चित्रपटाने जगभरात 200 कोटी रुपयांचा गल्ला जमवल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाच्या यशाच्या चर्चेदरम्यान इम्रानच्या प्रकृतीची बातमी समोर आल्याने चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.