
Image Source:(Internet)
काठमांडू : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे मृतांचा आकडा 600 च्या पुढे गेल्याची माहिती समोर आली असून, तब्बल 2 हजार नागरिक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असताना दुसरीकडे या संकटाच्या काळात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.
रसुवा परिसरात भोटेकोशी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून वाहत आलेले एका बँकेचे लॉकर त्रिशूली नदीत आढळले. हे लॉकर धादिंग जिल्ह्यातील गल्छी गावातील बेलखूखोलाजवळ पोहोचले. लॉकर सापडल्यानंतर काही स्थानिकांनी ते फोडून त्यातील रोकड लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
29 जणांनी फोडले लॉकर-
स्थानिक नागरिक बँकेचे लॉकर फोडून त्यातील पैसे काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच नेपाळ पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करत या प्रकरणातील 29 जणांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडून तब्बल 92 लाख 68 हजार 505 नेपाळी रुपये जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांपैकी बहुतांश जण हे गल्छी परिसरातील मास्टर गावचे रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, पुराच्या पाण्यात वाहून आलेले लॉकर नेमक्या कोणत्या बँकेचे होते आणि त्यातील एकूण किती रक्कम होती, याबाबतही तपास केला जात आहे.
नेपाळमध्ये पुराचा हाहाकार-
दरम्यान, नेपाळमध्ये आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणात विध्वंस केला आहे. अनेक नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, हजारो कुटुंबांवर संकट ओढवले आहे. अनेक जण अद्याप बेपत्ता असून, त्यांच्या कुटुंबीयांकडून शोध सुरू आहे.
या आपत्तीमध्ये 517 विदेशी नागरिकही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नेपाळमधील बचावकार्याचे आव्हान आणखी वाढले आहे. विविध देशांतील पर्यटकही पूरग्रस्त भागात अडकले होते. भारतीय नागरिकांनाही सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
भारताकडून तातडीची मदत-
नेपाळमधील परिस्थिती लक्षात घेऊन भारताने तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय सैन्याच्या विमानातून 10 टन मदत सामग्री नेपाळमध्ये पाठवण्यात आली आहे. तसेच बचाव आणि मदतकार्यात सहकार्य करण्याची तयारी भारताने व्यक्त केली आहे.
निसर्गाच्या या रौद्ररूपामुळे नेपाळमध्ये मोठे संकट निर्माण झाले असून, स्थानिक प्रशासनासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवरही मदतकार्य सुरू आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी नेपाळला आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.