
Image Source:(Internet)
नागपूर : यशोधरानगर परिसरातील दाट लोकवस्तीमध्ये घराचा वापर करून सुरू असलेल्या देहव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पोलिसांनी घरमालकाला अटक केली असून, तीन महिलांची सुटका करण्यात आली. सुटका केलेल्या महिलांपैकी एक महिला दिल्लीची रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रविण शालीकराम बिलसे (३०), रा. पवननगर, यशोधरानगर असे आहे. आरोपी आपल्या घरात महिलांना देहव्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देत त्यातून आर्थिक कमाई करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. एका महिलेसोबत दोन हजार रुपयांत व्यवहार ठरविण्यात आला. ठरल्याप्रमाणे महिला ग्राहकासोबत आरोपीच्या घरात पोहोचताच पोलिसांनी छापा टाकला. यावेळी आरोपीला ताब्यात घेत तीन महिलांची सुटका करण्यात आली.
पोलिसांच्या तपासात आरोपी ग्राहकांशी संदेशवहनाच्या माध्यमातून संपर्क साधत असल्याचे आढळले. महिलांचे छायाचित्र ग्राहकांना पाठवून व्यवहार निश्चित केला जात होता. ग्राहकांना थेट घराचा पत्ता न देता जवळच्या चौकात बोलावले जात असे. त्यानंतर आरोपी दुचाकीवरून त्यांना आपल्या घरी घेऊन जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी एका महिलेला देहव्यवसायासाठी दिल्लीहून नागपुरात आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी ती नागपुरात आली होती. सुरुवातीला ती हॉटेलमध्ये काम करत होती. त्यानंतर आरोपीच्या संपर्कात आल्यानंतर ती त्याच्या घरात राहू लागली.
कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल संच आणि दुचाकी असा एकूण १ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यशोधरानगर पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.या कारवाईची माहिती सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांनी दिली.