
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : देशातील चार प्रमुख खासगी बँकांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कर्मचारी संख्येत मोठी कपात केली आहे. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक या चार बँकांमध्ये मिळून सुमारे १३ हजार कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. बँकिंग व्यवहारांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर हे यामागील प्रमुख कारण मानले जात आहे.
यातील सर्वाधिक घट आयसीआयसीआय बँकेत झाली आहे. ३१ मार्च २०२६ रोजी बँकेतील कायम कर्मचाऱ्यांची संख्या १ लाख २४ हजार २९ इतकी होती. मागील वर्षाच्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या ५ हजार १४८ ने कमी झाली. इतर कर्मचाऱ्यांसह बँकेच्या एकूण मनुष्यबळात ६ हजार ६३३ ची घट नोंदवण्यात आली.
एचडीएफसी बँकेच्या कर्मचारी संख्येत ३ हजार ३४३ ची घट झाली. ॲक्सिस बँकेतील कर्मचारी संख्या सुमारे ३ हजार १०० ने कमी होऊन १ लाख १ हजार ३०० वर आली. तर कोटक महिंद्रा बँकेने १ हजार २६९ कर्मचाऱ्यांची कपात केली असून, बँकेतील कर्मचारी संख्या ७४ हजार ५४ इतकी झाली आहे.
शाखांचा विस्तार, तरीही मनुष्यबळात कपात-
विशेष म्हणजे या बँका एकीकडे देशभरात शाखांचे जाळे विस्तारत असताना दुसरीकडे कर्मचारी संख्या कमी करत आहेत. आयसीआयसीआय बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ५२८ नवीन शाखा सुरू केल्या. एचडीएफसी बँकेने २३४, तर ॲक्सिस बँकेने सुमारे ४०० नवीन शाखा सुरू केल्या.
मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, यूपीआय, एटीएम आणि स्वयंचलित सेवा यांचा वाढता वापर यामुळे बँकिंगमधील अनेक कामे आता डिजिटल पद्धतीने होत आहेत. खाते उघडणे, कागदपत्रांची पडताळणी, कर्ज प्रक्रिया आणि पैसे पाठविण्यासारख्या व्यवहारांसाठी पूर्वीपेक्षा कमी मनुष्यबळाची गरज भासत आहे. त्यामुळे शाखा विस्तार सुरू असतानाही काही पारंपरिक पदांची आवश्यकता कमी होत असल्याचे चित्र आहे.
मात्र ग्राहकांशी थेट संवाद साधणारे संबंध व्यवस्थापक, विक्री कर्मचारी, संपत्ती व्यवस्थापन सल्लागार आणि अन्य कुशल कर्मचाऱ्यांची मागणी अद्याप कायम आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात रोजगाराचे स्वरूप बदलत असून, भविष्यात डिजिटल कौशल्यांसह ग्राहक सेवा आणि आर्थिक सल्लागार क्षेत्रातील मनुष्यबळाला अधिक महत्त्व मिळण्याची शक्यता आहे.