नेपाळमध्ये पुराचे थैमान; ४०० जणांचा मृत्यू, २९० भारतीय बेपत्ता

    28-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

काठमांडू : नेपाळमध्ये मुसळधार पावसाने कहर केला असून पूर आणि भूस्खलनामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असून, मृतांची संख्या ४०० वर पोहोचली आहे. तर विविध देशांमधील १,४०० पेक्षा अधिक नागरिकांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. यामध्ये २९० भारतीय नागरिकांचा समावेश असल्याने त्यांच्या कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

बेपत्ता भारतीय नागरिकांची माहिती मिळवण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.

आणखी एका पुराचा धोका-
नेपाळमध्ये बचावकार्य सुरू असतानाच आणखी एका संभाव्य पुरामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. भोटेकोशी नदीजवळ पाण्याचा मोठा साठा निर्माण झाला असून त्याची पातळी वाढत असल्याची माहिती आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात पुन्हा पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

भोटेकोशी आणि त्रिशूली नदी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि गरज भासल्यास तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संभाव्य परिणाम लक्षात घेऊन भारतातील बिहार आणि उत्तर प्रदेशातील प्रशासनालाही सावध करण्यात आले आहे.

डोळ्यांसमोर वाहून गेले संसार-
पुराचा वेग इतका प्रचंड होता की अनेकांना स्वतःचा जीव वाचवण्यासाठीही पुरेसा वेळ मिळाला नाही. काही गावांमध्ये पाण्यासोबत आलेल्या मलब्याने घरे आणि इमारती जमीनदोस्त केल्या. काही ठिकाणी काही मिनिटांतच संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला.

नातेवाईक बेपत्ता असल्याने अनेक कुटुंबे रुग्णालये आणि मदत केंद्रांमध्ये त्यांचा शोध घेत आहेत. हातात छायाचित्रे, नाव आणि दूरध्वनी क्रमांक असलेले फलक घेऊन नागरिक आपल्या आप्तांचा शोध घेताना दिसत आहेत.

दळणवळण व्यवस्था ठप्प-
पुरामुळे रस्ते आणि पूल वाहून गेल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. मलब्याखाली वाहने अडकल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. रस्ते खराब झाल्याने बचाव पथकांना घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे येत आहेत.

भारतीय यात्रेकरूंचीही माहिती नाही-
कैलास मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेलेल्या काही भारतीय नागरिकांशी संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतातील त्यांच्या कुटुंबीयांकडून सातत्याने माहिती घेतली जात आहे. प्रशासनाकडून बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू असून, आपत्तीग्रस्त भागात मदतकार्य वेगाने राबवले जात आहे.

दरम्यान, परिस्थिती अद्याप गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागरिकांनी नदीकाठच्या आणि भूस्खलनाचा धोका असलेल्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.