
Image Source:(Internet)
नागपूर : शंकरपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात गुरुवारी सायंकाळी क्लोरीन वायूची गळती झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, कर्मचाऱ्यांनी वेळीच खबरदारी घेत अग्निशमन दलाला माहिती दिल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले.
जलशुद्धीकरण केंद्रात सुमारे ९०० किलो क्षमतेचा क्लोरीन सिलिंडर बसविण्यात आला आहे. सिलिंडरचा वॉशर निघाल्याने त्यातून क्लोरीन वायू बाहेर पडण्यास सुरुवात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वायूचा उग्र वास जाणवताच केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिस आणि अग्निशमन विभागाला कळविले.
माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी आवश्यक खबरदारी घेत गळतीवर नियंत्रण मिळविले आणि संबंधित सिलिंडर सुरक्षित ठिकाणी हलविला. जलशुद्धीकरण केंद्र गावापासून दूर असल्याने गळतीचा नागरिकांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी गोधनी येथील जलशुद्धीकरण केंद्रातही क्लोरीन वायू गळतीची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा शंकरपूर येथे अशी घटना घडल्याने जलशुद्धीकरण केंद्रातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शंकरपूरच्या या जलशुद्धीकरण केंद्रातून परिसरातील १४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती आहे.