नागपूर : राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी पोलीस कर्मचारी अजय सदाशिव सलामे याच्यासह एका महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, अजय सलामे याने लग्न करण्याचे आश्वासन देत महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. तसेच तिचे छायाचित्र आणि चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिल्याचेही महिलेने पोलिसांना सांगितले आहे.
या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पीडित महिलेने नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांची भेट घेतली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर रामटेक पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
अजय सलामे याने यापूर्वी माजी खासदार कृपाल तुमाने यांच्याकडेही अंगरक्षक म्हणून काम केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील दोन्ही संशयितांना अद्याप अटक झालेली नाही. तक्रारीतील आरोपांची पडताळणी करण्यासाठी रामटेक पोलीस पुढील तपास करीत आहेत.