Image Source:(Internet)
रासुवा : नेपाळमध्ये तिबेटच्या (Tibet) सीमेलगतच्या रासुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी अचानक आलेल्या महापुराने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला. स्याफ्रुबेसी आणि तिमुरे परिसराला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक घरे, वाहने, पूल आणि पायाभूत सुविधा पुराच्या प्रचंड लोंढ्यात वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. परिस्थितीची भीषणता पाहता मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.
भोटे कोशी नदीची पाणीपातळी अचानक वाढली-
बुधवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास रासुवा जिल्ह्यातून वाहणाऱ्या भोटे कोशी नदीच्या पाणीपातळीत अचानक मोठी वाढ झाली. काही वेळातच नदीने रौद्ररूप धारण केले आणि पाण्याचा प्रचंड प्रवाह तिमुरे आणि स्याफ्रुबेसी परिसरात शिरला.
विशेष म्हणजे, रासुवा परिसरात झालेल्या पावसामुळे हा पूर आलेला नसल्याचे नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. पुराचे पाणी तिबेटच्या दिशेने आले असल्याची प्राथमिक माहिती असून, या अचानक आलेल्या महापुरामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
गावांसह वाहने आणि पूल वाहून गेले-
पुराच्या वेगवान प्रवाहामुळे अनेक घरे आणि वाहने पाण्यात वाहून गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. काही गावांमध्ये तसेच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
तिमुरे परिसरातील सीमाशुल्क कार्यालयाच्या आवारात उभी असलेली अनेक वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली. नुकताच बांधण्यात आलेला एक पूलही पाण्याच्या जोरदार प्रवाहात कोसळून वाहून गेल्याची माहिती आहे.
तिमुरे हा नेपाळ आणि तिबेटदरम्यानच्या सीमाव्यापारासाठी महत्त्वाचा भाग असल्याने या नैसर्गिक आपत्तीचा व्यापार आणि वाहतूक व्यवस्थेवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
जीवितहानीचा अधिकृत आकडा अद्याप समोर नाही-
रासुवा जिल्हा प्रशासनाला अनेक गावं आणि प्रकल्पांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र, अद्याप मृत्यू किंवा बेपत्ता नागरिकांचा अधिकृत आकडा स्पष्ट झालेला नाही. पुराचा वेग आणि विध्वंसाचे प्रमाण लक्षात घेता मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू करण्यात आले असून, अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांकडून प्रयत्न केले जात आहेत.
नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा-
पुराची परिस्थिती लक्षात घेता नेपाळ प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा दिला आहे. रासुवा, नुवाकोट, धादिंग, चितवन आणि गोरखा या जिल्ह्यांतील नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी तातडीने सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतर करण्याची तयारी ठेवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सेना, पोलीस आणि हेलिकॉप्टर बचावकार्यात-
नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांनी परिस्थितीचा आढावा घेत बचाव आणि मदत पथकांना तातडीने घटनास्थळी रवाना करण्याचे निर्देश दिले आहेत. नेपाळ आर्मी, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलिसांचे जवान रासुवा आणि आसपासच्या भागात तैनात करण्यात आले आहेत.
नेपाळ आर्मीने दोन हेलिकॉप्टरही बचावकार्यासाठी तैनात केली असून, त्रिशूली नदी आणि आसपासच्या भागात शोधमोहीम सुरू आहे. पुरामुळे संपर्क तुटलेल्या भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तिबेटमधून आलेल्या पुरामुळे चिंता वाढली-
भोटे कोशी नदीचा उगम तिबेटमध्ये होतो. ही नदी पुढे नेपाळमधील त्रिशूली नदीला मिळते आणि त्रिशूलीचा प्रवाह भारतात गंडक नदीच्या रूपाने प्रवेश करतो. त्यामुळे भोटे कोशीच्या पाणीपातळीत अचानक झालेली वाढ केवळ रासुवा जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता नदीच्या प्रवाहाच्या पुढील भागासाठीही चिंतेचा विषय ठरली आहे.
तिबेटच्या दिशेने आलेल्या पाण्याचा प्रचंड लोंढा बुधवारी सकाळी भोटे कोशी नदीत दाखल झाला आणि काही वेळातच तिमुरे व स्याफ्रुबेसी परिसरात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. सध्या प्रशासनाकडून नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला जात असून, बचावकार्याला वेग देण्यात आला आहे.