पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली सुरक्षा व्यवस्थेची माहिती

Image Source:(Internet)
नागपूर : ईद-उल-मिलादच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था आखली आहे. मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रमांच्या ठिकाणी तसेच संवेदनशील भागांत सुमारे ३५०० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
मिरवणुकीचे मार्ग, प्रमुख चौक, बाजारपेठा आणि गर्दीच्या ठिकाणांवर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलिसांकडून शहरात सातत्याने गस्त घालण्यात येणार असून, संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
संशयास्पद व्यक्ती आणि समाजकंटकांच्या हालचालींवर पोलिसांची नजर राहणार आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सणाच्या काळात कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
समाजमाध्यमांवरून अफवा, खोट्या बातम्या, आक्षेपार्ह किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित होऊ नयेत, यासाठी विशेष पथकांकडून लक्ष ठेवले जाणार आहे. नागरिकांनी कोणत्याही संदेशाची खातरजमा केल्याशिवाय तो पुढे पाठवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.
ईद-उल-मिलादचा सण शांततेत आणि परस्पर सलोखा राखत साजरा करावा. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने ११२ या मदत क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.