आप’ सोडण्यामागचं खरं कारण समोर; अभिजीत दीपके यांचा मोठा खुलासा

    25-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे (AAP) माजी कार्यकर्ते आणि कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांनी ‘आप’ सोडण्यामागचे वैयक्तिक कारण स्पष्ट केले आहे. कमी पगार मिळत असल्याने भविष्यातील आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन आपण पक्ष सोडला आणि परदेशात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला, असा दावा त्यांनी केला आहे.

दीपके यांनी यापूर्वी २०२० ते २०२३ या कालावधीत आम आदमी पार्टीसोबत काम केल्याचे सांगितले होते. ते पक्षाच्या सोशल मीडिया टीमचाही भाग होते. मात्र, त्यांचे काही जुने व्हिडिओ आणि सोशल मीडिया पोस्ट समोर आल्यानंतर त्यांच्या ‘आप’सोबतच्या संबंधाच्या कालावधीबाबत प्रश्न उपस्थित झाले होते.

‘आप’ सोडण्यामागे नेमकं कारण काय?
न्यूज २४ ला दिलेल्या मुलाखतीत दीपके यांना पक्षाच्या काही संस्थापक सदस्यांनी ‘आप’ आपल्या मूळ उद्दिष्टांपासून भरकटल्याचा आरोप करत पक्ष सोडला, त्याच कारणामुळे त्यांनीही पक्ष सोडला का, असा प्रश्न विचारण्यात आला.

यावर दीपके यांनी आर्थिक कारण असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, ‘आप’मध्ये काम करताना त्यांना फारसे पैसे मिळत नव्हते. त्यावेळी ते आपल्या विशीत आणि नंतर पंचविशीच्या मध्यात होते. भविष्यात कुटुंबाची जबाबदारी वाढणार असल्याने आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचा त्यांनी विचार केला.

परदेशात शिकल्यास चांगली नोकरी मिळेल-

दीपके यांच्या म्हणण्यानुसार, परदेशात जाऊन पदवी घेण्याचा निर्णय त्यांनी याच विचारातून घेतला. आम आदमी पार्टीमध्ये काम करताना परदेशात शिक्षण घेतलेल्या अनेक लोकांना भेटल्याचेही त्यांनी सांगितले. परदेशात शिक्षण घेतल्यानंतर चांगली नोकरी मिळेल आणि अधिक पैसे कमावता येतील, असा त्यांचा विचार होता. त्यामुळे ‘आप’ सोडण्यामागे पक्षाच्या विचारधारेविषयी कोणताही संघर्ष नव्हता, तर तो पूर्णपणे वैयक्तिक आणि आर्थिक निर्णय होता, असे दीपके यांनी स्पष्ट केले.

दीपके यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासासोबतच ‘आप’मधील त्यांच्या भूमिकेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.