नितीन गडकरी राजकारण सोडणार?अखेर 'त्या' विधानावर गडकरींच्या कार्यालयाचा खुलासा

    25-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या एका विधानामुळे कालपासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. “मी आता जास्त काम करू शकत नाही. आता नव्या पिढीलाच संधी दिली पाहिजे,” असे विधान गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात केले होते. या विधानाचा राजकीय अर्थ काढत गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. मात्र, आता गडकरी यांच्या कार्यालयाकडून या विधानावर स्पष्टीकरण देण्यात आले असून, या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

गडकरींच्या विधानाचा राजकारणाशी संबंध नाही
नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, गडकरी यांनी केलेल्या विधानाचा कोणताही राजकीय अर्थ नाही. हे विधान लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या संदर्भात करण्यात आले होते. या ट्रस्टच्या उभारणीत गडकरी यांचा मोठा वाटा असून, ट्रस्टच्या माध्यमातून आदिवासी भागात एकल विद्यालये चालवली जातात.

ट्रस्टच्या भविष्यातील वाटचालीबाबत बोलताना गडकरी यांनी नव्या पिढीला जबाबदारी देण्याची भूमिका मांडली होती. “मी फक्त संस्था उभी करण्याचं काम केलं. पण संस्था वाढवण्याचं खऱ्या अर्थाने काम संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. मी आता जास्त काम करू शकत नाही. त्यामुळे या ट्रस्टच्या वाढीसाठी नव्या पिढीने पुढे आले पाहिजे,” अशी त्यांची भूमिका असल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले.

नव्या पिढीला संधी देण्याचा संदेश
गडकरींचे विधान हे केवळ ट्रस्टच्या कामकाजाशी आणि भविष्यातील नेतृत्वाशी संबंधित होते. ट्रस्टच्या कार्यक्रमात केलेल्या या विधानाचा राजकारणाशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे गडकरी राजकारण सोडणार असल्याच्या चर्चांना आता ब्रेक लागला आहे.

आदिवासी गावांच्या विकासावरही भाष्य-
नागपुरातील या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. आगामी काळात विकासाचा परिघ आणखी वाढणार असून, महाराष्ट्रातील कोणतेही आदिवासी गाव विजेपासून वंचित राहू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

गावांमध्ये वीज पोहोचली तर त्या भागाचा विकास स्पष्टपणे दिसून येतो, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

भाजपमधील बदलांमुळे चर्चांना उधाण-

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी त्यांच्या नव्या टीमची घोषणा केली. या टीममध्ये 65 सदस्य असून त्यापैकी 51 नवीन चेहरे आहेत. भाजपमधील या संघटनात्मक बदलानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचीही चर्चा सुरू आहे.

अशातच गडकरी यांच्या “नव्या पिढीला संधी” देण्याच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, गडकरी यांच्या कार्यालयाने स्पष्टीकरण देत हे विधान राजकारणाशी संबंधित नसून लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या भविष्यातील नेतृत्वासंदर्भात असल्याचे स्पष्ट केले आहे.