
Image Source:(Internet)
पुणे : मांजरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन बाराव्या दिवशीही सुरूच आहे. दीर्घकाळ उपोषण केल्याने आंदोलनकर्ते राहुल धनवे यांची प्रकृती खालावली असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या यकृतावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने आंदोलनस्थळी चिंता आणि संतापाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांनी सरकारने तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. आंदोलनकर्त्यांच्या प्रकृतीला धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी सरकारची असेल, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे. काही विद्यार्थ्यांनी माध्यमांसमोर हात जोडून सरकारला आवाहन केले, तर परिस्थिती सांगताना अनेक विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले.
मांजरी स्टड फार्म परिसरातील या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मात्र, अद्याप ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांची नाराजी कायम आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी दूरध्वनीवरील चित्रसंवादातून आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून आंदोलनावर तोडगा काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या
आदिवासी वसतिगृहाबाबत यावर्षी घेतलेला निर्णय रद्द करावा.
२०११ मधील निर्णयाची अंमलबजावणी करावी.
रिक्त असलेली १२ हजार ५०० पदे भरावीत.
थेट लाभ हस्तांतरण योजनेतील विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीत वाढ करावी.
वसतिगृह प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.
जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी सहा महिन्यांची मुदत द्यावी.
शहरांच्या मध्यवर्ती भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करावीत.
आंदोलनाचा कालावधी दोन आठवड्यांच्या जवळ पोहोचला असताना एका विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे सरकार या मागण्यांवर तातडीने चर्चा करून तोडगा काढणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.